Tata Motors PV Share : भारतीय वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स'च्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीची ब्रिटनमधील लक्झरी युनिट 'जग्वार लँड रोव्हर' मधील उत्पादनाला ब्रेक लागल्याच्या वृत्ताने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात जेएलआरचा वाटा तब्बल ७०% असल्याने, ब्रिटनमधील या घडामोडींचा थेट फटका भारतीय शेअर बाजारातील टाटांच्या स्टॉकला बसला आहे.
सॉलिहुल प्लांटमधील उत्पादन ठप्प
मिळालेल्या माहितीनुसार, जेएलआरने आपल्या ब्रिटनमधील 'सॉलिहुल' प्लांटमधील उत्पादन दोन आठवड्यांसाठी रोखले आहे. तांत्रिक बिघाड आणि सुट्या भागांच्या कमतरतेमुळे कंपनीला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. कंपनीचे सर्वात जास्त नफा मिळवून देणारे 'रेंज रोव्हर' आणि 'रेंज रोव्हर स्पोर्ट्स' यांसारख्या प्रीमियम मॉडेल्सचे उत्पादन यामुळे प्रभावित झाले आहे. योगायोगाने ही सुटी ईस्टरच्या आधीच ठरलेल्या सुट्ट्यांच्या काळात आली आहे.
सायबर हल्ल्याचे 'आफ्टरशॉक्स'
जेएलआरसाठी ही पहिलीच अडचण नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनी एका मोठ्या सायबर हल्ल्याचा बळी ठरली होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने १.८ अब्ज युरो नफा कमावला होता, मात्र सायबर हल्ल्यामुळे होणारे नुकसान २ अब्ज युरो इतके अंदाजित आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीकडे सायबर विम्याचे संरक्षण नव्हते, ज्यामुळे हा पूर्ण आर्थिक भार आता कंपनीच्या तिजोरीवर पडणार आहे. 'स्कॅटर्ड लॅप्सस हंटर्स' नावाच्या हॅकर ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
वाचा - अदानी की अंबानी? ५ वर्षांच्या शर्यतीत कुणी मारली बाजी; १ लाखाचे किती झाले? वाचा सविस्तर तुलना
शेअर बाजारातील पडझड
शुक्रवारी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून ३०१.१० रुपयांच्या निचांकी स्तरावर पोहोचला. मागिल १ महिन्यातील घसरण १७% तर १ वर्षातील घसरण २५% इतकी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शेअर सातत्याने दबावाखाली असून आजच्या वृत्ताने त्यात मोठी भर पडली आहे.
